'सभोवताली दाटुन आलेल्या काळ्याकुट्ट अंधाराच्या साम्राज्यात स्वतःचे लख्ख असे अस्तित्व अधोरेखित करीत, लक्ष लक्ष काजव्यांचा सुरू असलेला लयबद्ध चमचमाट...जणू नभोमंडळातील असंख्य असे तारकापुंजच खाली धरतीच्या भेटीला आले आहे...!' हे वर्णन वाचूनच तुम्ही केवळ कल्पना करा... कसा अदभूत देखावा दिसत असेल ना हा.
कोणी निसर्गवेड्याने काजव्यांचे केलेलं हे वर्णन किती वास्तवदर्शी आहे याची अनुभूती स्वतः जंगलात जाऊन रात्रीच्या वेळी जंगलवाटा तुडविल्या शिवाय वाचणाऱ्याला येणार नाही. लुकलूकणाऱ्या काजव्यांच्या मायावी दुनियेत स्वतःला हरवून देऊन, काजव्यांची ताऱ्यांशी सुरू असलेली स्पर्धा बघण्याचे भाग्य यंदा खूप कमी लोकांच्या नशिबी आलं. आणि त्यातलाच मी एक नशीबवान आहे हे सांगताना मला माझ्या स्वतःचा हेवा वाटतो आहे. पण एक मात्र नक्की की स्वतःला निसर्गाच्या हवाली करून त्याच्याकडून जे मिळेल ते त्याच्याशी एकरूप होऊन घेण्याची मजाच काही और असते.
काजव्यांविषयी सांगायचे झाले तर निसर्गप्रेमींप्रमाणेच साहित्यिक, लेखक, कवी यांच्या लेखण्यांना भुरळ घालणाऱ्या, 'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरवीनाऱ्या काजव्यांची ही लुकलुकणारी मयसभा बघणं म्हणजे केवळ एक अपूर्व आणि अविस्मरणीय असा अनुभव असतो. साधारण दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात लोणावळा आणि राजमाची परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते.
काजवा हा असा एकच जीव आहे की जो स्वयं प्रकाशमान आहे. खर तर काजवे जगभर आढळतात. तरीही त्यांचे अब्जावधींच्या संख्येने वास्तव्य उष्णकटीबंधीय प्रदेशात असते. जगभरात वैज्ञानिकांस काजव्यांच्या २००० पेक्षा जास्त प्रजाती आजतागायत सापडल्या आहेत. 'कोलिओऑप्टेरो' नावाच्या भुंग्याच्या कुळात काजव्यांचा समावेश केला जातो. अळीतून प्रौढावस्थेत जातो तेव्हा काजवा स्वयंप्रकाशी बनतो. त्यांची लांबी दोन ते अडीच सेंटीमीटर असते. मंद काळसर किंवा पिवळा तांबूस रंगाच्या या किटकाच्या मादीपेक्षा नराचे पंख जास्त विकसित झालेले असतात. तुलनेने माद्या काहीशा सुस्त असतात. निरनिरळ्या ठिकाणी निरनिराळ्या आकाराचे रंगांचे काजवे दिसून येतात. पिवळा, हिरवा, नारंगी, निळा, तांबडा, पांढरा असे रंग काजवे उधळतात. त्यांच्या प्रकाशाचा रंग ५१० ते ६७० नॅनोमीटर असतो.
साधारणपणे जिथे मुबलक प्रमाणात पाणी, जंगल आणि मोठाले वृक्ष असतील अशा वातावरणामध्ये काजवे वाढतात. समागमानंतर काही दिवसांनी, मादी काजवा अंडी घालते. ही अंडी जमिनीमध्ये किंवा जमिनीच्या अगदी थोडेसे खाली लपवली जातात. अंदाजे ३ ते ४ आठवड्यात, या अंड्यांमधुन अळी बाहेर येतात. या अळ्या म्हणजेच भविष्यातील काजवे. एखाद्या अळईचे काजव्यामध्ये रुपांतर झाल्यावर मात्र काजवे पाने फुले फुलातील परागकण इत्यादी खातात. पण सगळेच काजवे असेच काहीतरी खातात असे नाही. काही प्रौढ मादी काजवे चक्क दुसऱ्या प्रजातीच्या नर काजव्यांना देखील गट्टम करतात.
मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू होणारी काजव्यांची चमचम जून महिन्यात अधिकाधिक वाढत जाते. आणि ही वाढणारी चमचम म्हणजे पावसाच्या आगमनाची एकप्रकारे वर्दी देत असते. पण एकदा का मोसमी पावसाने जोर धरला की या चमचमणाऱ्या काजव्यांच्या जीवनचक्राचीही अखेर होते...
लोणावळ्यापासून पुढे राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर डेला अडव्हेंचर पासून पुढे साधारण दोन किलोमीटर अंतरावर उजव्या हाताला पटेल डॅम म्हणून एक छोटे धरण लागते. या धरणाच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात काजवे आढळून येतात. तसेच पुढे राजमाची गावात गेल्यावर त्याठिकाणच्या जंगलात काजव्यांचे थवेच्या थवे दिसू लागतात. पण लक्षात असुद्या की काजवे पहायला जायचे म्हणजे ज्या परीसरात जाणार आहे त्या परीसरातील खडा-न-खडा माहिती असणे आवश्यक आहे. किंवा कोणी माहितगार सोबत असणे गरजेचे आहे. कारण भटकंती अंधारातच करावी लागते. साधारणतः रात्री ८ वाजल्यापासून रात्री ११.३० पर्यंत हे काजवे फार उत्तम प्रकारे बघता येतात. त्यानंतर मात्र त्यांचे लुकलूकने कमीकमी होत जातं.
हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा 'बसेरा' असतो. या झाडांवर एक विशिष्ट पद्धतीने लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप आपल्या डोळ्यांना सुखाऊन जाते. विस्मयचकित मुद्रेने निसर्गाचं अनुपम वैभव पाहता-पाहाता आपण भान हरपून जातो.
दुर्दैवाने यंदाचा काजव्यांचा पूर्ण हंगाम हा करोना या जीवघेण्या विषाणूच्या तडाख्यात वाहून गेला आहे. त्यामुळे यावर्षी जरी काजव्यांच्या मयदुनियेत आपल्याला प्रवेश नाही करता आला तरी नाराज न होता पुढील हंगाम येण्याची वाट बघा, आणि आपल्या घरी सुरक्षित रहा.
विशाल पाडाळे
No comments:
Post a Comment