लोणावळा नगरपरिषदेचे श्रीमान बाबासाहेब डहाणूकर रुग्णालय
पर्यटननगरी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं लोणावळा शहर. लोणावळा शहराची आजमितीला लोकसंख्या ही ६० हजाराहून अधिक असून या शहरासोबत जोडल्या गेलेल्या ग्रामीण भागातील लोकसंख्या विचारात धरली तर सुमारे सव्वा लाखाहून अधिक लोकांची जीवनधारा लोणावळा शहराशी निगडित आहे. याशिवाय पर्यटन स्थळ असल्याने याठिकाणी देशविदेशातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात.
एवढं मोठं शहर आणि एवढी मोठी लोकसंख्या असूनही येथील आरोग्यसेवा ही अत्यंत तुटपुंजी अशीच आहे. येथील नागरिकांना अनेकदा किरकोळ वैद्यकीय कारणासाठी देखील पुणे, पिंपरी चिंचवड किंवा मुंबई सारखी ठिकाण गाठावी लागतात. ज्याठिकाणी पैशाचा खूप मोठा अपव्यय होतो. त्यामुळे लोणावळा शहरातच अत्यल्प दारात रुग्णसेवा देणारे एखादं अद्यावत रुग्णालय असावं अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
नाही म्हणायला लोणावळा शहरात लोणावळा नगरपरिषदेकडून एक रुग्णालय चालविण्यात येत होतं. ज्याठिकाणी लोणावळा शहर आणि परिसरासोबतच रायगड जिल्ह्यातील खोपोली, खालापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक उपचारासाठी येत होते. मात्र सदर रुग्णालय मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. या रुग्णालयाचा विषय नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील महत्त्वाचा मुद्दा ठरला. सध्या सोशल मीडियावर देखील याच रुग्णालयाच्या विषयावर लोणावळा नगरपरिषदेला धारेवर धरण्यात येत आहे.
या वरील सर्व पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषदेच्या श्रीमान बाबासाहेब डहाणूकर रुग्णालयाचा संपूर्ण इतिहास अभ्यासावा असा विचार डोक्यात आला. आणि त्यातून समोर आलेल्या कागदपत्रांचा मागोवा घेत असताना त्याच्या आधारे जी माहिती समोर आली ती त्रयस्थपणे मी माझ्या या ब्लॉक मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. यात कोणत्याही राजकीय व्यक्तीला किंवा पक्षाला लक्ष करण्याचा किंवा त्यांचा उदोउदो करण्याचा माझा उद्देश नाही.
लोणावळा नगरपरिषदेकडून सन १९६२ सालापासून ५० खाटांची सुविधा असलेलं श्रीमान बाबासाहेब डहाणूकर रुग्णालय चालविण्यात येत होतं. या रूग्णालयासाठी एकूण चार डॉक्टर ज्यात एक मुख्य वैद्यकीय अधिकारी, एक वैद्यकीय अधिकारी, एक निवासी वैद्यकीय अधिकारी आणि एक महिला वैद्यकीय अधिकारी नेमणुकीला होते. याशिवाय मुख्य नर्स, सहाय्यक नर्स, औषध निर्माता, वॉर्ड वूमन, वॉर्ड बॉय, स्विपर, ड्रेसर, रुग्णवाहिका चालक असा एकूण इतर ४४ सपोर्टींग स्टाफ नियुक्तीला होता. लोणावळा आणि पंचक्रोशीतील नागरिकांना याठिकाणी अत्यंत वाजवी आशा दरात रुग्णसेवा उपलब्ध होत होती.
सर्व व्यवस्थित असताना या रुग्णालयाची खरी परवड आणि अधोगती सुरू झाली ती १९८६ साली. १९८६ साली तत्कालीन महाराष्ट्र शासनाच्या (शासन निर्णय क्र. डी. एसपी१०८५/१५२७/आरोग्य ३ दि.१९/३/१९८६) निर्णयानुसार नगरपरिषदांचे दवाखाने शासनाकडे हस्तांतरित करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. त्यानंतर २००५ साली मा.संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांनी कर्मचारी आकृतिबंध मंजूर करताना नगरपरिषद रुग्णालयाचा कार्यरत स्टाफ अस्थायी करून, रिक्त झालेली पदे कोणत्याही कारणास्तव भरणेची मान्यता दिली नाही.
दरम्यानच्या काळात लोणावळा नगरपरिषदेच्या श्रीमान बाबासाहेब डहाणूकर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हळूहळू सेवानिवृत्त झाले. सर्वात शेवटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. सावरकर हे ३०/६/२००७ रोजी सेवानिवृत्त झाले. महाराष्ट्र शासनाने रुग्णालयासाठी मान्यताच काढून घेतल्याने नगरपरिषदेला वैद्यकीय अधिकारी अर्थात डॉक्टरची नेमणूक करता येईना. नगरपरिषद स्तरावर एखादा वैद्यकीय अधिकारी नेमण्या इतपत लोणावळा नगरपरिषदेची आर्थिक स्थिती न्हवती आणि हॉस्पिटल मधून मिळणारे उत्पन्न ही जवळपास नाहीच्या बरोबर होतं. माझ्याकडे २०१४, २०१५ आणि २०१६ ची आकडेवारी आहे. ज्यात या तीन वर्षात वैद्यकीय अधिकाऱ्याशिवाय सुरू असणाऱ्या दवाखान्याच्या स्टाफच्या पगारावर आणि दवाखान्याच्या थोड्याफार रखरखाव यावर नगरपरिषदेचे एकूण २ कोटी ९९ लाख, १४ हजार इतके म्हणजे जवळजवळ ३ कोटी रुपयांचा खर्च झाला. त्यामुळे नगरपरिषदेने हा दवाखाना चालवणं म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे होतं.
दरम्यानच्या काळात लोणावळेकर नागरिकांना स्वस्तात रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी नगरपरिषदेने २००६ साली श्रीमान बाबासाहेब डहाणूकर रुग्णालय इमारतीचा बाह्यरुग्ण विभाग व कुटुंब कल्याण केंद्र कक्ष वगळता इतर भाग संजीवनी मेडिकल फौंडेशन या संस्थेला काही अटी आणि शर्तीवर रुग्णालय चालू करण्यासाठी दिला. हे करीत असतानाच दुसरीकडे तत्कालीन नगराध्यक्ष भुपेंद्र उर्फ राजू चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १२ डिसेंबर २००७ रोजी ठराव क्र. १४७ (विषय क्र.१२९) अनव्ये हे रुग्णालय बांधा, वापरा व हस्तांतरीत करा असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पण दुर्दैवाने या ठरावावर पुढं काहीच प्रगती झाली नाही.
१८ मे २०१० रोजी मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी या रुग्णालयाचा विषय विधानसभेत घेऊन जात अतारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर शासकीय पातळीवर काही हालचाल जाणवली. मात्र हे रुग्णालय शासनाकडे वर्ग केल्याशिवाय याठिकाणी काहीही प्रगती होणं शक्य नसल्याचे निदर्शनास आल्याने शेवटी ८ नोव्हेंबर २०१२ रोजी लोणावळा नगरपरिषदेच्या तत्कालीन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ठराव क्र. १४३ (विषय क्र.१२८) अन्वये श्रीमान बाबासाहेब डहाणूकर रुग्णालयाची इमारत, आणि बाजूची इतर मोकळी जागा अशी एकूण ३३४१.५० चौ.मी. इतके क्षेत्र व बाजूच्या स्व. यशवंतराव चव्हाण संकुलातील १२ निवासस्थानं ज्याची एकूण जागा ५१५.१७ चौ.मी. अशी शासनाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
नगरपरिषदेच्या वरील निर्णयानंतर १७ जानेवारी २०१३ रोजी शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१२/प्र.क्र.१४१/ आरोग्य-३ अनव्ये लोणावळा शहरात उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास शासनाची मंजुरी मिळाली. त्यानंतर १८ ऑगस्ट २०१३ रोजी मा.जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे यांनी श्रीमान बाबासाहेब डहाणूकर रुग्णालयाची समक्ष पाहणी केली. यावर त्यांनी पत्र क्र. जिरुप/नियोजन/उपजिरु लोणावळा/१४६७७/१३ दि.२० सप्टेंबर २०१३ नुसार सदर जागा ही १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभे करण्यासाठी अपुरी असल्याचे सांगत, एकूण ६ एकर जागेची आवश्यकता असल्याचं सांगितलं. त्यानंतरही नगरपरिषदेचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. ९ फेब्रुवारी २०१५ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष अमित गवळी यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा ठराव क्र. १६७ (विषय क्र.१४४) हा नगरपरिषद रुग्णालय हस्तांतराचा फेर ठराव मंजूर करण्यात आला.
या ठरावाच्या नंतर ८ डिसेंबर २०१५ रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडून पत्र क्र. पसन/कावि/१४५/२०१५ अनव्ये रुग्णालयाची जागा हस्तांतरित करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात आली. यानंतर अनेक पत्रव्यवहार आणि पाठपुराव्यानंतरही १५ मार्च २०१७ रोजी ठराव क्र. १२८ नुसार आरोग्य विभागाकडे रुग्णालय हस्तांतराचा पुन्हा एक ठराव मंजूर करावा लागला. यातच ३ जून २०१७ रोजी मा.उपमुख्यवास्तुशास्त्रज्ञ, पुणे यांनी आपल्या पत्र क्र.३०१/३१५/२०१७/१४२ नुसार याठिकाणी उपलब्ध जागेत केवळ ५० खाटांचेच रुग्णालय होऊ शकते असा अहवाल देत, एक मेख खोचून ठेवली. या मधल्या काळात नगरपरिषद रुग्णालयाच्या अनुषंगाने विधानसभेत काही तारांकित प्रश्न देखील वेळोवेळी उपस्थित करण्यात आले. अखेर १४ सप्टेंबर २०१७ रोजी संकीर्ण २०१७/प्र.क्र.२९२/आरोग्य-३अ नुसार शासनाकडून रुग्णालयाच्या हस्तांतराचा आदेश पारित करण्यात आला. त्यानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता करीत अखेर १५ मे २०१८ रोजी नगरपरिषदेचे श्रीमान बाबासाहेब डहाणूकर रुग्णालयाच्या जागेची ट्रान्स्फर डिड शासनासोबत करण्यात आली. आणि याठिकाणी नगरपरिषदेचा रोल संपून खऱ्या अर्थाने हा रुग्णालयाचा चेंडू शासनाच्या आरोग्यविभागाच्या कोर्टात गेला.
यानंतर काम सुरू झाले ते नवीन दवाखाण्याचे आराखडे तयार करण्याचे. १०० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयासाठी ६ एकर जागेची आवश्यकता असताना ते याठिकाणी उपलब्ध केवळ ३० गुंठा जागेत बसवण्याची कठीण कसरत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाला करावी लागली. यात खूप मोठा वेळ खर्ची पडला. दरम्यान या रूग्णालयासाठी वाढीव चटई निर्देशांक(FSI) आणि वाढीव उंची वाढवून मिळवी अशी मागणी आरोग्य विभागाकडून नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे. आतापर्यंत या रुग्णालय इमारतीच्या आराखड्याचे एकूण ३ प्रेझेन्टेशन मा.जिल्हा शल्य चिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनिअर यांच्या समोर देण्यात आले. मात्र त्यात वारंवार अनेक त्रुटी येत राहिल्या. यावर पर्याय म्हणून विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी एका एक्सपर्ट एजन्सीची मदत सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊ केली. सद्यस्थितीत या एक्सपर्ट एजन्सीने ग्राउंड अधिक चार अशी एकूण चार मजली इमारतीमध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी आवश्यक सर्व सुविधा बसतील असे आराखडे तयार करून दिले आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर हे आराखडे मंजुरी साठी प्रलंबित राहिले आहे.
हे आराखडे मंजूर झाल्यावर शासनाकडून इमारतीसाठी अर्थसंकल्पीय तरतुद केली जाईल. हे सर्व लवकरात लवकर झाले आणि पुढील इमारत पूर्ण करण्याचे काम देखील वेळेत झाले तर किमान २ ते ३ वर्षात लोणावळा शहरात एक मल्टी स्पेशालिस्ट शासकीय उपजिल्हा रुग्णालय सुरू होईल अशी अपेक्षा आपल्याला करता येऊ शकते.
विशाल पाडाळे
No comments:
Post a Comment