लोणावळा : लोणावळा शहरात आज शनिवारी कोरोनाचे 20 रुग्ण मिळून आले आहेत . यासर्वांची अँन्टीजन तपासणी करण्यात आली होती . यामध्ये दोन विद्यमान नगरसेवकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर एक नगरसेवक नुकतेच कोरोनावर मात करून बरे झाले आहेत . आज पॉझिटिव्ह आलेले नगरसेवक हे वलवण व आगवालाचाळ विभागातील आहेत .
आज शहरातील भांगरवाडी परिसरात 5. तुंगार्ली व न्यु तुंगार्ली परिसरात 3 , बाजार भागात 1 , नांगरगाव परिसरात 2 . वलवण समतानगर परिसरात 4 , खंडाळा परिसरात 4 , बारा बंगला परिसरात 1 असे एकून 20 रुग्ण मिळून आले आहेत . ज्या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत , त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःची कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे . लोणावळा शहरातील कोरोना रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये , महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावा , सामाजिक अंतर पाळावे , व्यापऱ्यांनी देखील स्वतः मास्क लावावे तसेच चेहऱ्यावर मास्क असल्याशिवाय कोणालाही माल देऊ नये असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे .
लोणावळा शहरात शंखेश्वर रुग्णालय व खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सोबतच कुरवंडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र , कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र , सिंहगड महाविद्यालय कुसगाव येथे मोफत लसीकरण सुरू आहे . तरी नागरिकांनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे . तसेच लोणावळा नगरपरिषद शाळा क्र . 1 या ठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले असून याच ठिकाणी नागरिकांची कोरोना अॅन्टीजन तपासणी व आरटीपीसीआर तपासणी मोफत केली जाते . फ्रंटलाईन वर्करसाठी बंद झालेले लसीकरण पुन्हा सुरू झाले असल्याने सर्व वयोगटातील फ्रंटलाईन वर्कर लस घेऊ शकतात .

No comments:
Post a Comment