लोणावळा : आज बुधवार दिनांक १४ एप्रिल रोजी लोणावळा शहरात उच्चांकी ५८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. याशिवाय मंगळवारी एकाच दिवसात शहरातील ४ जणांचा कोरणामुळे मृत्यू झाला आहे. या वाढत्या संख्येमुळे लोणावळा शहरवासीयांना सावध होण्याची वेळ आली आहे.
लोणावळा शहरात बुधवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागात १४, खंडाळा विभागात १२, नांगरगाव विभागात ५, भुशी विभागात ५, वलवण विभागात ४, लोणावळा गावठाण विभागात ३, ठोंबरेवाडी, तुंगार्ली, न्यू तुंगार्ली, टेबललँड या विभागात प्रत्येकी २ तर बाजारपेठ, गवळीवाडा, बाराबंगला, शेतकरी पुतळा, कैवल्यधाम, हुडको आणि म्हाडा या विभागात प्रत्येकी १ अशा ५८ जणांचा समावेश आहे .
लोणावळा शहर बाजारपेठत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवून नागरिक खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असतात. त्यातच शहरातील प्रत्येक रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांचे पीक आले असून फूट फूट अंतरावर भाजीपाला विक्रेते आपली पथारी हंथरून भाजी विकताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाने यात लक्ष टाकून ही कोंडी सोडविणे गरजेचे आहे, अन्यथा ही कोंडी कोरोना फैलावाचा मार्ग ठरू शकेल यात शंका नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभर संचारबंदी जाहीर केल्यानंतर नागरिकांनी बाजारपेठसोबतच पेट्रोल पंपावर देखील खूपच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मागील लॉकडाऊन प्रमाणे यावेळी पेट्रोल मिळणार नाही या भीतीने दोन दोन तास रांगेत उभे राहुन नागरिकांनी आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरून घेतले. मात्र यामुळे पेट्रोल पंपातून सुरू झालेल्या रांगा मुख्य रस्त्यावर लांबच लांब गेलेल्या दिसत होत्या, आणि त्यामुळे रहदारीला त्याचा मोठया प्रमाणावर अडथळा निर्माण झाला होता.

No comments:
Post a Comment