लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 22 April 2021

लोणावळा शहर पुढील पाच दिवस संपूर्ण लॉकडाऊन

लोणावळा : पर्यटन नगरी लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं कडक पावलं उचलीत सात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. यातील पहिल्या निर्णयांतर्गत लोणावळा शहरात शनिवार दि. २४ एप्रिल ते बुधवार दिनांक २८ एप्रिल हे पुढील पाच दिवस कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मा. मुख्यमंत्री महोदयांनी अनेकदा कळकळीची विनंती करूनही नागरिक त्यांच्या सूचनांचे गांभीर्याने पालन करीत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. उपाय म्हणून राज्यशासनाने घोषित केलेल्या संचारबंदीला देखील वाटाण्याच्या अक्षता लावून नागरिक मोठ्या संख्येने सर्वत्र मुक्त संचार करताना सर्रास दिसत आहेत. केवळ लोणावळा शहराचा विचार केल्यास याठिकाणी मागील काही दिवसांपासून सातत्याने ४० ते ५० कोरोना रुग्ण आढळून येत आहे तर दररोज ३ ते ४ जणांचा मृत्यू होतो आहे. 

लोणावळा शहरात कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाला पायबंद घालण्यासाठी गुरुवारी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पो.नि. दिलीप पवार, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, आरोग्य सभापती रचना सीनकर, पाणी पुरवठा सभापती सुधीर शिर्के, शिक्षण समिती सभापती ब्रिंदा गणात्रा, काँग्रेस गटनेत्या आरोही तळेगावकर, नगरसेवक राजू बच्चे, निखिल कवीश्वर, विशाल पाडाळे, उपमुख्याधिकारी डॉ. भगवान खाडे तसेच नगरपरिषदेच्या सर्व विभागाचे विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. 

लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. असं असताना सर्व जबाबदारी नगरपरिषद प्रशासनावर थोपटून मोकळे होणारे तहसीलदार, प्रांत अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी या संपूर्ण काळात एकदा तरी लोणावळा शहराला भेट देऊन येथील आढावा घेतला का असा प्रश्न नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी उपस्थित करीत शरसंधान साधले. त्यांच्या या प्रश्नाला इतर नगरसेवकांनी देखील दुजोरा दिला. लोणावळा नगरपरिषद कोविडग्रस्तांसाठी संपूर्ण ताकत लावून काम करीत असताना शासनाने तसेच आरोग्य विभागाने देखील आवश्यक ती सर्व मदत नगरपरिषदेला करणं अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.

सदर बैठकीत कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या स्तरावर कोणकोणत्या उपाययोजना आखता येईल यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तद्नंतर काही निर्णय घेण्यात आले आणि सदर निर्णयांची अंमलबजावणी शनिवार दिनांक २४ एप्रिल पासून अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय कोरोनामुळे मागील काही दिवसात झालेल्या मृत्यूंबाबत देखील या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.  

नगरपरिषदेच्या बैठकीत एकूण जे ७ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ते पुढील प्रमाणे..

१) शनिवार दि. २४ एप्रिल ते बुधवार दिनांक २८ एप्रिल हे पुढील पाच दिवस लोणावळा शहरात कडक लॉकडाऊन घेण्यात येणार. या दरम्यान केवळ वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या आस्थापना जसे की रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स, मेडिकल लॅब उघड्या राहतील. याशिवाय केवळ घरपोच दुधसेवा पुरवणाऱ्या दुग्धालयांना सकाळी ७ ते ९ दरम्यान परवानगी राहील.

२) अग्निशमन दलाची मदत घेऊन तीन दिवसात संपूर्ण लोणावळा शहर सॅनेटाईज केले जाणार.

३) शहराच्या मुख्य बाजारपेठेत ज्या ठिकाणावरून प्रवेश होतो त्या कुमार चौक आणि भांगरवाडी राममंदिर  याठिकाणी तपासणी चौक्या उभारण्यात येणार.

४) सदर तपासणी चौक्यावर रॅपिड अँटीजन चाचणी करणारे पथक तैनात केले जाणार असून त्याठिकाणावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक संशयित नागरिकाची तपासणी करून त्याचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्यास त्याची रवानगी थेट कोविड केअर सेंटर मध्ये केली जाणार.

५) पाच दिवसाच्या लॉकडाऊन नंतर शासकीय आदेशाप्रमाणे खुल्या राहणाऱ्या प्रत्येक दुकानदाराला तसेच भाजी विक्रेत्यांना स्वतःची आरटी पीसीआर चाचणी करून घेऊन ते प्रमाणपत्र जवळ बाळगाव लागणार. अन्यथा संबंधित विक्रेत्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार.

६) कोरोना रुग्णांची शहरांतर्गत ने आण करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीनं रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाणार. 

७) मागील काळात शहरात कोरोना मूळे जितके मृत्यू झाले, त्या सर्वांवर प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टर कडून काय उपचार करण्यात आले याबाबतचा वैद्यकीय अहवाल मागवला जाणार. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages