लोणावळा : लोणावळा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढतच आहे. आज बुधवारी (दि. 21 एप्रिल) लोणावळा शहरात कोरोनाचे पुन्हा 50 नविन रुग्ण मिळून आले आहे तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन दिवसात लोणावळा शहरात 145 नविन रुग्ण मिळून आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज लोणावळा शहरातील भांगरवाडी विभागात सर्वांधिक 13 रुग्ण मिळून आले आहेत. त्या खालोखाल वलवण विभागात 8, खंडाळा विभागात 7, नांगरगाव विभागात 5, तुंगार्ली विभागात 4, भुशी परिसरात 3, ठोंबरेवाडी व पोस्ट आँफिस परिसरात 2 तर स्वराज्यनगर, मॅकडोन्लड, लोणावळा, खोंडगेवाडी, गावठाण व पांगोळी येथे प्रत्येकी 1 असे एकूण 50 रुग्ण मिळून आले आहेत. आज मृत पावलेल्यांमध्ये वलवण, तुंगार्ली व भांगरवाडी विभागातील नागरिकांचा समावेश आहे.
लोणावळा शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. कोरोनाची लक्षणे असल्यास आजार अंगावर न काढता तात्काळ कोरोना तपासणी करून घ्यावी. लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्र. 1 याठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी कोरोना तपासणी केली जात आहे. तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या निलकमल थिएटर समोरील गुजराती शाळा येथील शंकेश्वर रुग्णालय, खंडाळा प्राथमिक उपकेंद्र, कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरवंडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व कुसगाव सिंहगड महाविद्यालय येथील ग्रामीण रुग्णालय याठिकाणी कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. त्याठिकाणी जाऊन 45 ते 60 वयोगटातील नागरिकांनी मोफत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळा सकाळी 7 ते सकाळी 11 अशी चार तास करण्यात आली आहे. असे असताना लोणावळा बाजारपेठेतील भाजीची अनेक दुकाने 12 वाजल्यानंतरही खुली असल्याचे पहायला मिळाले. व्यावसायिकांनी किमान स्वतःच्या जिविताची काळजी घेऊन व्यावसाय करावा.

No comments:
Post a Comment