लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई; ओरिसा राज्यातील अपहृत मुलीची केली सुटका
लोणावळा : ओरिसा राज्यातून अपहरण करण्यात आलेल्या एका 17 वर्षीय पीडित मुलीची नवलाख उंबरे, ता. मावळ येथून सुटका सहीसलामत सुटका करण्याची कौतुकास्पद कामगिरी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक ०६/०२/२०२२ रोजी पोलीस अधीक्षक देशमुख यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांना कळविले की, ओरीसा येथील सिमुलीया पोलीस ठाणे याठिकाणी अपहरण झालेली 17 वर्षीय पीडित मुलगी तळेगांव दाभाडे पोलीस ठाणेचे हद्दीत नवलाख उंबरे येथे एका खोलीत बंदीस्त आहे. तिला मदत करून तीस ताब्यात घ्या. या आदेशानुसार पो. नि. प्रविण मोरे यांनी पो.उप.नि. सचिन बनकर, सहा.पो.फौजदार बोकड, पो. हवा. जांभळे, महिला पो. हवा. घुगे यांचे पथक तयार करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून समन्वय साधून तात्काळ रवाना केले. सदर पथकाने मोबाईल टॉवर लोकशेनच्या आधारावर नवलाख उंबरे येथे पोहचून तेथील स्थानिकांचे मदतीने पिडीत मुलीचा शोध घेऊन एका बंद खोलीतून तिला सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकाराबाबत स्थानिक पोलीस स्टेशन एम. आय. डी. सी तळेगांव दाभाडे यांना माहीती दिली.
पोलीस अधिक्षक देशमुख, पोलीस उप अधीक्षक घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पिडीत मुलीला बाल कल्याण समिती यांचे समक्ष हजर करून सध्या तिला चैतन्य महिला आश्रम, मोशी याठिकाणी सुखरूप ठेवण्यात आले आहे. सदरची माहिती ओरिसा येथील संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment