वलवण बायपासवर उभारण्यात आलेला कुजगाव टोल वसुली नाका बंद करा; लोणावळेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया
लोणावळा : लोणावळ्यात होत असलेले वाढते अपघात रोखण्यासाठी शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी. मात्र त्याचवेळी ही वाहने शहारत येण्यास कारणीभूत असलेला वलवण येथील बायपासवर उभारण्यात आलेला टोल वसुली नाका सर्वप्रथम बंद करा अशी सर्वपक्षीय मागणी लोणावळा पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकीत लोणावळेकरांकडून करण्यात आली.
लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांमध्ये अपघात वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध पक्षांच्या वतीनं पोलीस स्टेशनला निवेदन देऊन अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने लोणावळा पोलीस स्टेशनच्यावतीने लोणावळा नगरपरिषद कार्यालयात नगरपरिषद, पोलीस स्टेशन, रस्ते विकास महामंडळ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आय आर बी आणि सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपस्थित नेत्यांनी तसेच नागरिकांना रस्ते विकास महामंडळ आणि आय आर बी च्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
लोणावळा ते खोपोली बाह्यवळण या दरम्यानच्या केवळ काही किलोमीटर अंतरासाठी वलवण येथील कुजगाव टोल नाक्यावर पूर्ण एक्सप्रेस हायवेचा टोल वसूल केला जातो. हा टोल टाळण्यासाठी अवजड वाहणे बंदी असतानाही लोणवळा शहरातून मार्गक्रमण करतात. त्यामुळे शहरात वाहतूक ठप्प होणं किंवा अपघातासारखे प्रकार घडतात. याशिवाय गवळीवाडा नाका या वर्दळीच्या ठिकाणी आयआरबी कंपनीने रस्त्यामध्ये लावलेले दुभाजकांचे दगड सतत निघत असतात, शिवाय त्याची उंची कमी असल्याने त्याठिकाणी सातत्याने अपघात होत असतात. या दोन महत्त्वाच्या मुद्यांसह रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावणं, रस्त्याच्या दुतर्फा होणारी पार्किंग बंद करणे, पिकाडेल हॉटेल समोरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांची अतिक्रमण दूर करणे या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, रस्ते विकास महामंडळाच्या पि. डी. कोटक, आय.आर.बी. चे पि. के. शिंदे, काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, भाजपचे शहर सचिव अमित गंधे, मनसेचे शहराध्यक्ष भरत चिकणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, महिलाध्यक्षा मंजू वाघ, माजी नगरसेवक राजू बच्चे, भरत हरपुडे, नारायण पाळेकर, दिलीप गुप्ता, बाळासाहेब पायगुडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पुढील 15 दिवसात वरील मुद्द्यांवर काही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही तर शहरात सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. तर दर एक महिन्याने अशाच पद्धतीची आढावा बैठक घेण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांना दिल्या.

No comments:
Post a Comment