मागील चार वर्षांपासून लोणावळा नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी पदावर कार्यरत असणारे सचिन पवार यांची सोमवारी प्रशासकीय बदली झाली. त्यानंतर त्यांना निरोप देण्यासाठी मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षांसह सर्व उपस्थित नगरसेवक आणि नगरपरिषद अधिकारी तसेच कर्मचारी भावूक होऊन या प्रत्येकाचे डोळे पाणवल्याचे चित्र बघायला मिळाले.
लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांची सातारा याठिकाणी जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून बदली झाली. तर त्याचवेळी सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत असलेले रवी पवार यांची लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश राज्य प्रशासनाच्या वतीनं पारित करण्यात आले. मंगळवारी मावळते मुख्याधिकारी सचिन पवार यांनी नवनियुक्त मुख्याधिकारी रवी पवार यांच्याकडे आपला कार्यभार सोपवला. तद्नंतर लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं सचिन पवार यांचा निरोप समारंभ आणि रवी पवार यांचा स्वागत समारंभ एकसाथ आयोजित करण्यात आला.
लोणावळा नगरपरिषदेने मागील चार वर्षात जो काही विकास साधला आणि स्वच्छ सर्वेक्षणात संपूर्ण देशात दुसऱ्या नंबर पर्यंत जी घोडदौड केली त्यात फार मोठा वाटा हा मुख्याधिकारी सचिन पवार यांचा राहिलेला आहे. कोणत्याही शहराचा विकास हा तेथील स्थानिक राज्यकर्ते आणि प्रशासन या दोघांच्या समनव्यव यावर अवलंबून असतो. एकप्रकारे ही रथाची दोन चाके असतात, आणि ही दोन्ही चाके जेंव्हा एकसाथ चालतात तेंव्हाच विकास साधला जातो. मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या प्रयत्नातून हे साधले गेल्यानेच पुढील सर्व काम सोप्पी होत गेल्याचं सांगत लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या सोबत काम करीत असतानाच्या काही आठवणींना उजाळा दिला. या आठवणी सांगत असताना नगराध्यक्षा जाधव यांच्या डोळ्यात पाणी आले. आणि त्याचवेळी या समारंभाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणवले.
कामाचा वेळेत निपटारा करणारा, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कधीही सुट्टी न घेता आपली कर्तव्ये काटेकोरपणाने बजावणारा, कामामध्ये स्वतःला वाहून घेणारा असा कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणजे मुख्याधिकारी सचिन पवार हे असून, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोणावळा शहराला ज्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे ते केवळ प्रशंसनीय असल्याचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी सांगितले.
लोणावळा नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी रवी पवार यांनी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारताना मावळते मुख्याधिकारी सचिन पवार यांनी लोणावळा नगरपरिषदेला ज्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, ती उंची अजून वाढवण्याचा प्रामाणिक करणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.

No comments:
Post a Comment