लोणावळा शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना तसेच डुकरांना पकडण्याची मोहीम लोणावळा नगरपरिषद आरोग्य विभागाच्या वतीनं हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५ मोकाट जनावरे पकडून कोंडावड्यात टाकण्यात आली असून १०४ डुकरे पकडून त्यांची रवानगी स्लॉटर हाऊस मध्ये करण्यात आली आहे.
लोणावळा शहरात मागील काही दिवसांमध्ये रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहरात अनेकदा वाहतूक कोंडी तसेच अपघाताचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यासंदर्भात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी नगरपरिषदेकडे करण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेत लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवि पवार यांनी ही सर्व मोकाट जनावरे पकडण्यासंदर्भात आदेश निर्गमित केले. या आदेशानुसार नगरपरिषद आरोग्य विभाग अधिकारी तन्वीर मेमन यांनी नगरपरिषद कर्मचारी आणि बाह्य कंत्राटदार यांच्या मार्फतीने ही मोहीम सुरू केली. जनावरे पकडल्यावर त्या जनावरांवर मालकी हक्क सांगणाऱ्या कडून पहिल्यांदा तीन हजार रुपये दंड व पुन्हा ते जनावर रस्त्यावर पकडले गेल्यास दुप्पट दंड आणि जनावरांची गोशाळेत रवानगी असं दंडाचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे. तर डुकरांच्या बाबतीतही त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे धोरण जाहीर केले गेले आहे.
या मोहिमेअंतर्गत जनावर पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ही जनावरे कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात आहे, त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मार लागणे, इजा होणे अशा घटना घडत आहेत. तरीही ही मोहीम सुरू झाल्यानंतर मोकाट जनावरांची संख्या कमी होऊ लागली असून लोणावळेकर नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
कोंडावड्याचे कुलूप तोडून जनावरे लंपास
लोणावळा नगरपरिषदेचे कर्मचारी आणि कंत्राटदार जोखीम उचलून रस्तावर फिरणारी मोकाट जनावर पकडून कोंडावड्यात ठेवत आहेत. मात्र काही महाभाग कोंडावड्याचे कुलूप तोडून जनावरांना लंपास करीत आहेत. असे कृत्य करणाऱ्यांवर नगरपरिषदेकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभाग अधिकारी तन्वीर मेमन यांनी सांगितले आहे.

No comments:
Post a Comment