लोणावळा केवळ व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने लोणावळ्यातील एका ६५ वर्षीय कोरोना बधिताचा बुधवारी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शासकीय यंत्रणांची कोरोना बधितांबद्दलची अनास्था आणि रुग्णांना हाताळण्यात आरोग्य विभागाला येत असलेलं अपयश उघडपणे समोर येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे वसाहत येथील संबंधित जेष्ठ नागरिकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तद्नंतर त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांना गरज असताना व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे आता लोणावळा शहरात कोरोना बधितांच्या मृतांची एकूण संख्या ६ झाली असून हे प्रमाण ४% पेक्षा अधिक आहे.
लोणावळा शहरातील मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. लोणावळा शहरात लक्षण नसलेल्या किंवा अत्यल्प लक्षण असलेल्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेलं झालावाडी कोविड केअर सेन्टर वगळता तीव्र लक्षण असलेल्या रुग्णांसाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सुविधा असलेलं एकही रुग्णालय अद्यापी लोणावळा शहरात उपलब्ध नाही. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि मुख्याधिकारी रवी पवार हे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांमार्फत ते शासनदरबारी पाठपुरावा करीत आहे. नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी देखील या मागणीसाठी उपोषणाचे हत्यार उचलले होतं. मात्र शासनाकडून या मागणीला किती लवकर आणि किती प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळेल याबाबत शंका आहे.
लोणावळा शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये या सेवा सुरू करण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. मात्र त्याठिकाणी देखील केवळ ऑक्सिजन सपोर्ट असणारे २० बेड आणि व्हेंटिलेटर सुविधा असलेले केवळ २ बेड उपलब्ध होणार आहे. मात्र ते देखील अपुरे पडणार असल्याने शहरात अजून मोठ्या प्रमाणावर या सुविधा निर्माण करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेकडून चाचपणी सुरू आहे. सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेन्टर उभारण्यासाठी आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चर पुरवण्याची नगरपरिषदेची तयारी आली आहे. फक्त या सुविधा सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा स्वरूपाच्या असणं आवश्यक असल्याने नगरपरिषदेला त्याकडेही लक्ष द्यावं लागत आहे. त्यामुळे कमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या अनेक संस्थानसोबत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा चर्चा करीत आहेत.

No comments:
Post a Comment