लोणावळा : लोणावळा शहरात आज मंगळवारी कोरोनाचे 18 रुग्ण मिळून आले आहेत. लोणावळा नगरपरिषद शाळा क्र. 1 येथे घेण्यात आलेल्या अँन्टीजन तपासणी मध्ये शहरातील 15 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले तर खाजगी ठिकाणी झालेल्या तपासणीमध्ये 3 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामुळे लोणावळा शहरातील सक्रिय रुग्णसंख्या 160 झाली आहे.
आज शहरातील भांगरवाडी, नांगरगाव, गवळीवाडा, बाराबंगला, बाजारपेठ, वर्धमान सोसायटी, खंडाळा, आरपीटीएस खंडाळा या परिसरात रुग्ण मिळून आले आहेत. लोणावळा शहरातील कोरोना रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावा, सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव या वारंवार करीत आहे.
आज रात्रीपासून राज्यात सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध लागू करण्यात आले असून शुक्रवारची रात्र ते सोमवारी सकाळपर्यत कडक लाॅकडाऊन जाहिर करण्यात आला. तसेच दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहणार असल्याने कोणीही खरेदीसाठी विनाकारण गर्दी करू नये तसेच चेहर्यावर मास्क लावल्याशिवाय कोणीही संचार करू नये, शासकीय नियमांचे पालन करावे. लोणावळा शहरात शंखेश्वर रुग्णालय व खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सोबतच कुरवंडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र, सिंहगड महाविद्यालय कुसगाव येथे मोफत लसीकरण सुरू आहे. नागरिकांनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment