लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभाचे नियोजन करताना लोणावळ्याच्या नगराध्यक्षा तसेच कोणत्याही नगरसेवकाला विचारात न घेता शिष्टाचाराचा जाणीवपूर्वक भंग करण्यात आला असल्याचा आरोप करीत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी असे पत्र नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिले आहे.
आज बुधवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ज्या जागेवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे त्या जागेवर पूर्वी नगरपरिषदेच्या मालकीचे रुग्णालयात उभे होते. २००५ सालापासून शासनाने येथील वैद्यकीय अधिकारी पद अस्थायी केल्याने हा दवाखाना बंद पडला होता . सदर ठिकाणी शासकीय दवाखाना सुरू होऊन त्याठिकाणी लोणावळेकर नागरिकांना वाजवी दारात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या नेतृत्वाखाली चार वर्षांपूर्वी सध्या अस्तित्वात असलेला दवाखाना आणि त्याची जागा शासनाकडे वर्ग करण्याचा ठराव लोणावळा नगरपरिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला. आणि त्यानुसार हा दवाखाना व सदर जागा शासनाकडे विनामोबदला हस्तांतरित करण्यात आला .
एकूणच या रुग्णालयाच्या उभारणी मध्ये नगरपरिषदेचा देखील मोलाचा वाटा असताना सदर कार्यक्रम आखताना तसेच त्याचे नियोजन करताना नगरपरिषदेला विचारात घेतले गेले नाही. याशिवाय सदर रुग्णालयाच्या नकाशाला आद्यपी पूर्णतः मंजुरी मिळालेली नाही असा आरोप नगराध्यक्षा जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. सदर कार्यक्रमाची कोणतीही सूचना कल्पना न देता राजकीय सूडबुद्धीने शिष्टाचाराचे उल्लंघन केले गेल्याने संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे नगराध्यक्षा जाधव यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment