युक्रेनमध्ये अडकलेल्या महक आणि मोनिका लवकरच मायदेशी परतणार
लोणावळा : रशिया व युक्रेन युद्धामुळे युक्रेन देशात शिक्षण घेणारी भारतातील जवळपास 20 हजार मुलं मुली अडकून पडली होती. यातच लोणावळ्यातील महक गुप्ता आणि मोनिका दाभाडे या दोन मुलींचा देखील सहभाग होता. युक्रेन मधील ओडेसा या भागात आडकलेल्या या दोन्ही मुली अखेर युद्धाच्या चौथ्या दिवशी अनुक्रमे मोल्दोव्हा आणि रोमानियो या देशात दाखल झाल्या असून त्या आता सुरक्षित स्थळी असून लवकरच त्या मायदेशी परतणार आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने सुरू झालेल्या युद्धमुळे महक गुप्ता, मोनिका दाभाडे व इतर विद्यार्थी यांनी चार दिवस इमारतीच्या बंकर मध्ये राहून काढले. युद्धाचे गडद ढग डोक्यावर असताना देखील भारतीय अँम्बेसी व घरातील सदस्यांशी फोनवरून संपर्क होत असल्याने त्यांची ख्याली खुशाली समजत होती. मात्र त्या तेथून सुरक्षित आपल्या घरी कधी परततील याची काळजी दोघींच्याही घरच्यांना लागून राहिलेली होती. युद्ध स्थळावरून शेजाऱ्याच्या इतर देशात जाण्याचा पर्याय त्यांच्यापुढे होता मात्र ओडेसा ते रोमानिया, पोलंड अथवा मोल्दोव्हा या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर काय परिस्थिती आहे याची पुसटही कल्पना नसल्याने सर्वत्र भितीचे वातावरण होते. मात्र रविवारी मोनिका दाभाडे ही इतर विद्यार्थ्यांसह रोमानियो येथे तर महक गुप्ता ही मोल्दोव्हा येथे युक्रेन देशाच्या सिमा ओलांडून दाखल झाल्या आहेत. महक हिने तिचा व्हिडीओ आपल्या कुटुंबियांना शेअर केला असून त्यात तिच्यासह सर्व भारतीय आपल्या देशाचे राष्ट्रगीत म्हणताना दिसून येत आहे. सध्या महक आणि मोनिका या दोघीही सेफ झोनमध्ये असून लवकरच मायदेशात दाखल होणार असल्याने त्या दोघींच्या कुटुंबायांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे.

No comments:
Post a Comment